एक बंगला असतो. त्यांच्या बागेत सुंदर फुलझाडं आणि हिरवेगार भाजीचे वाफे असतात. उघड्या राहिलेल्या फाटकातून शेळीची दोन कोकरं बागेत शिरतात. ती न दिसल्यामुळे कुणीतरी फाटक लावून घेतं, कोकरं आतच अडकतात . जरा वेळानं घरातला पाच-सहा वर्षांचा छोटा मुलगा कोकरं पाहून बाहेर येतो. त्यांच्यासोबत पळापळी खेळायला लागतो. घरातून आई ओरडते, “ए, रोपं तुडवू नका रे.’
आता मुलगा कोकरांना हुसकवायला त्यांच्या मागे लागतो. फाटक बंद झाल्यामुळे कोकरांना रस्ता सापडत नाही. त्यांची तिथल्यातिथेच गोलगोल पळापळी चालू होते. खिडकीतून त्यांचा गोंधळ पाहणारी आई सांगते, “अरे, फाटक उघड ना, नाहीतर कोकरं बाहेर कुठून जाणार?”
मुलगा क्षणभर विचार करतो आणि फाटकाची कडी काढतो. टणाटण उड्या मारत कोकरं बाहेर पळून जातात. मुलगा नवलाने म्हणतो, “अरे , खरंच की…!”
असे ‘खरंच की!’ प्रसंग मोठेपणीही अनेकदा येतात. मात्र आताच्या गोंधळलेपणात, लहानपणीचा निरागस बालीश गोडवा नसतो. अनेकदा एखाद्या विचारात, सवयीत आपण अडकलोय हे कळत देखील नाही. मनात सतत एक अस्वस्थता मात्र जाणवते. तेचतेच विचार पुन्हापुन्हा फिरत असतात. सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात. फाटक दिसत नाही, दिसलं तरी उघडायचं कसं ते कळत नाही. आपण थकून जातो आणि अचानक कशामुळेतरी काहीतरी उमगतं. कधी एखाद्या छोट्याशा अनुभवामुळे, कधी एखाद्याशी संवाद केल्यामुळे, एखाद्या ‘मीम’ किंवा ‘कोट’मुळे किंवा वाचनात / पाहण्यात काहीतरी आल्यामुळे आपण सजग होतो. बंद फाटक उघडतं. पुढचा रस्ता दिसायला लागतो. अशा क्षणभर चमकून रस्ता दाखवणाऱ्या छोट्याछोट्या क्षणांनाच आपण म्हणतो, “इनसाईट” किंवा “आहा क्षण” !!