शाळा प्रत्यक्ष चालू होत्या तेव्हाची, म्हणजे कोविडकाळाच्या आधीची गोष्ट.

“आई, आज 1 to 30 आकडे लिहून आई-बाबांना दाखव” असं  होमवर्क दिलंय.” छोट्या श्रेयानं सांगितलं.  संध्याकाळी रफ वहीत तिनं आकडे काढले, आईकडून तपासून घेतले आणि ‘करेक्ट’ च्या खुणेकडे अभिमानानं बघत वही कपाटात ठेऊन दिली.  

“अग, वही दप्तरात ठेव, उद्या टीचरना दाखवायचं असेल ना?” आईनं विचारलं.

“नाही. टीचर बघणार नाहीयेत. आई-बाबांना दाखव एवढंच सांगितलंय.” ती म्हणाली.

“असं कसं? मग काही मुलं लिहिणार नाहीत आणि लिहिलं म्हणून खोटंच सांगतील ना?” आईला पटलंच नाही. तिनं लगेच शंका बोलून दाखवली.

“आई, असं खोटं काही केलेलं चालत नाही आम्हाला मुलांना.” श्रेया रागावून म्हणाली. 

तिच्या गोंडस फणकाऱ्याकडे कौतुकाने पाहताना, आईच्या एकदम लक्षात आलं. ‘आईकडून तपासून घ्या, मी तपासणार नाहीये’ असं मुलांना सांगताना, टीचरनी मुलांवर विश्वास ठेवला होता. प्रामाणिकपणा आणि विश्वास  टीचर कृतीतून शिकवत होत्या आणि आई मात्र श्रेयाच्या मनातही न आलेली शक्यता बोलून दाखवून, खोटेपणा कसा करता येऊ शकेल ते तिला सुचवत होती.

खरं तर या वयातली मुलं प्रामाणिकच असतात. पण आपल्या मोठेपणाच्या अनुभवांच्या बोलण्यातून नकळत मुलांवर संस्कार कसे होतात त्याचा आईच्या डोक्यात आज लख्ख प्रकाश पडला होता. शंकाग्रस्त ‘पालकगिरी’तून बाहेर पाडून आपण समंजस ‘पालकपण’ शिकतो आहोत असं आईला वाटलं.

***