फायनान्स मॅनेजर अस्मिता थोडी एकलकोंडी, अबोलच होती पण तिला बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड कायम मिळायची. प्रेझेंटेशन्स उत्तम करायची, पण साध्या गप्पा मारताना कम्युनिकेशन प्रॉब्लेम. दोन मिनिटांच्या वर संवाद सुचायचा नाही तर कधी इतकी बोलत सुटेल की थांबायचं कुठे ते कळणार नाही. त्यातल्या त्यात मैत्री स्वानंदीशी.

एकदा स्वानंदी आपल्या मुलाची शाळा, क्लासेसबद्दल बोलत होती. अस्मिता अचानक म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी माझ्या अभ्यासाकडे कधी लक्षच दिलं नाही. त्यांनी थोडं पुश करायला हवं होतं. मग बारावी सायन्सला कमी मार्क्स पडले म्हणून मला कॉमर्सला जावं लागलं नसतं.”   

स्वानंदी नवलाने म्हणाली, “अख्खं फायनान्स डिपार्टमेंट जळतं तुझ्या अचिव्हमेंटस पाहून आणि तुला सायन्समध्ये करीअर करायचं होतं?”

“तसंही नाही, पण बारावीला मार्कांमुळे साईड बदलावी लागली याची लाज वाटते.अजून आईबाबांचा राग येतो”

“काहीही हं. तू कॉमर्ससाठीच होतीस. सायन्समध्ये करिअर कदाचित जमलंही नसतं. आईबाबांना तुझी आवड आणि कल समजला नाही म्हणून रागावू शकतेस, पण नंतर तरी योग्य निर्णय घेतला हे महत्वाचं नाही का? लाज काय वाटून घ्यायची साईड बदलण्याची? बारावीच्या मार्कांना आता अर्थच किती उरलाय?” अस्मिता विचारांत पडली.  

“खरंच की गं स्वानंदी, मी असा कधी विचारच केला नव्हता. किती वर्षं स्वत:ला कमी समजत राहिले. बेस्ट परफॉर्मन्स अवार्ड मिळाल्यावरसुद्धा वाटायचं, ‘…पण हिला बारावीच्या मार्कांमुळे साईड बदलावी लागली” असंच लोकं मनात म्हणत असणार. लोकांमध्ये मिसळण्याचा आत्मविश्वास त्यामुळेच गेला माझा.”

बोलता बोलताच अस्मिताला काहीतरी उलगडत होतं. कधीकाळच्या बारावीच्या मार्कांत अडकून तिथेच गोलगोल फिरणं थांबलं होतं. कमीपणाच्या विळख्यातून ती मुक्त होत होती. स्वत:च नकळतपणे बंद करून ठेवलेलं फाटक स्वानंदीमुळे अचानक उघडलं होतं.

असं भूतकाळात कुठेतरी अडकून पडणं अनेकांचं होतं. ‘मला अमुक ‘हवं होतं’ च्या दु:खात अडकल्यामुळे माझ्याजवळ आज जे ‘आहे’, त्याकडे दुर्लक्ष होतं. घडून गेलेल्या गोष्टी आता बदलणार नसतातच, तरीही त्याच त्या विचारांत गोलगोल फिरणं थांबत नाही. एखादी स्वानंदी जेव्हा ‘आज’ची जाणीव करून देते, फाटक उघडू पाहते, तेव्हा तरी त्यातून बाहेर पडायचं,  की भूतकाळातला तो सल कुरवाळत आयुष्य घालवायचं, हा ‘चॉइस’ मात्र आपलाच असतो.   

***